खूप अस्वस्थ झोलोय...
दोन दिवसांपूर्वी काही कामानिमित्त एका ग्रामपंचायत कार्यालयात गेलो, तेथे नेहमीसारखीच कार्यालयीन अधीक्षकांच्या टेबलसमोर गर्दी होती. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या होत्या. मी पत्रकार असल्याने मला आदराने खुर्ची मिळाली. त्याच गर्दीतून एक कोवळा आवाज कानावर पडला. पाहतो तर एक माझ्या परिचयाची नसलेली अनोळखी शाळकरी (आठवी इयत्तेत असावी) मुलगी उभी होती. कार्यालयीन अधीक्षकांना काहीतरी विनंती करत होती. नंतर मी विचारले काय झाले ? त्यावर अधीक्षकांनीच सांगितले. हिला गावातील एका नामांकित शासन मान्यता प्राप्त शाळेत प्रवेश हवा होता, पण डोनेशन भरण्याची परिस्थिती नसल्याने तिला प्रवेश मिळाला नाही. मग मी त्या मुलीला थेट विचारले काय अडचण आहे ? त्यावर ती म्हणाली, ‘ मला शिकायचे आहे, पण माझ्याकडे चार हजार रुपये फी भरण्यासाठी नसल्याने मला घरी बसावे लागले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने माझ्या घरचे कोणीही शाळेत विचारायला गेले नाहीत, त्यामुळे माझे वर्ष वाया गेले. मला शिकण्याची इच्छा आहे, काही तरी करा प्लिज...’ तीचे शब्द ऐकूण माझी झांज उतरली. कॅशलेसच्या दिशेने निघालेल्या भारतात स्त्री शिक्षणाची अजूनही वाताहतच आहे, असे माझे ठाम मत बनले. तिच्या शिक्षणाचे शैक्षणिक शुल्क मी स्वत: माझ्या पगारातून भरण्यास तयार आहे. तिला विश्वास दिला की, काळजी करू नको, आपण नक्कीच यातून मार्ग काढू. तिचा मोठा भाऊ म्हणून तिला मी प्रवेश मिळवून देणार हे नक्की. रात्रभर या भयाण वास्तवामुळे मला झोप लागली नाही. क्रांती ज्योती सावित्रींनी स्त्री शिक्षणाचा मार्ग खुला केला. पण डोनेशनच्या नावाखाली मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शिक्षण संस्थांनी त्यांच्या महान कार्यात बाधा आणली.
मंदिरात दररोज लाखोंचे दान जमा होते, वाढदिवसावर हजारो रुपये खर्च होतात, राजकीय फ्लेक्स बोर्डवरही खर्च सुरूच आहे, वाईनशॉपी तेजीत सुरू आहेत. हे सारेच आता कॅशलेस करायचे, पण माझ्या सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार ? या विचाराने मी अस्वस्थ झालोय. गरिब, गरजु मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्यासाठी एखादी सेवाभावी संस्था स्थापन करावी का ? करायची तर निधी कसा उपलब्ध होईल असे अनेक प्रश्न माझ्या वाटेत अडथळा निर्माण करणारे आहेत. पण सुरुवात करायची आहे. आपल्या बहुमोल प्रतिक्रिया माझी ताकत वाढवतील, अशी अपेक्षा आहे.
दीपक कांबळे
Comments
Post a Comment