पत्रकारांच्या वेदनांचा परिपाक...,
पत्रकार संरक्षण विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी मिळाल्याने पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निमित्ताने पत्रकारांच्या विविध संघटनांमध्ये असलेली शीतस्पर्धाही समोर आली. ‘आम्ही पाठपुरावा केला म्हणून कायदा मंजूर’ अशा वल्गना आता सोशल साईटवर सुरू आहेत. माझा या प्रकाराला विरोध आहे, कारण हा कायदा पत्रकारांच्या वेदनांतून पाझरलेल्या कळांचा परिपाक आहे, असे मी मानतो. राज्यात मागील पाच वर्षात ३४३ पत्रकारांवर हल्ले झाले. २०१६ या एकाच वर्षात ७९ हल्ले झाले त्यात ८८ पत्रकार जखमी झाले. निर्भीड बातमीदारी करताना अनेकांना प्राण गमवावे लागले. ही सारी उठाठेव पत्रकार वेतन आयोग मागण्यासाठी कधीच करत नाही. तर सामान्य जनतेची गैरसोय करणाऱ्या यंत्रणेचे वाभाडे काढण्यासाठी तो लढतोय.
गाडीला बायकोने लटवकलेल्या डब्यातली भाजी-भाकरी डब्यातच आंबून जाते, हे त्याला दुपारच्या जेवनाचा डबा, चार वाजता उघडल्यावरच कळते. कोणत्याही पाठबळाअभावी, कोणत्याही शस्त्राविणा लेखनीच्या जोरावर मातब्बरांचा थरकाप उडवण्याची धमक माझा पत्रकार ठेवतो. वरच्या पदावर बसून राज्याच्या अन् देशाच्या राजकारणाचे गुऱ्हाळ कोणीही मांडते. पण गावात राहून सरपंचाविरोधात बातमी देणे किती अवघड असते, हे वेगळे सांगायची गरज नाही. ही धमकही आमचा पत्रकारच ठेवतो. अन्यायाला वाचा फोडू पाहणाऱ्या अर्धपोटी पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांनी काय साध्य केले, हा संशोधनाचा भाग आहे. पण या हल्ल्यामुळे पत्रकार कधीच थांबला नाही. पत्रकार संरक्षण कायद्याच्या मसुद्यात नेमके काय आहे ? कायद्याने पत्रकाराला किती बळ मिळेल, यावर अभ्यास करूनच बोलावे लागेल. पण तूर्त संघटनांनी ‘आमच्यामुळे कायदा झाला, असा ढोल बडवणे’ थांबवावे.
Comments
Post a Comment